मुंबई - शिवस्वराज्य यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सोमवारपासून सुरवात झाली आहे. ही यात्रा जालना जिल्ह्यात असताना भोकरदन येथे राष्ट्रवादी पक्षाची सभा झाली. यावेळी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सभेला संबोधित करताना केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. जालना जिल्ह्यातील जनतेने दानवे यांना अनेकवेळा संधी दिली. मात्र खाऊसाहेब दानवेंनी नेहमी ‘चकवाच’ दिला असा खोचक टोला मुंडे यांनी दानवेंना लगावला.
राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा सोमवारी जालना जिल्ह्यात होती. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि आमदार संतोष दानवे यांचा मतदारसंघ असलेल्या भोकरदन येथे राष्ट्रवादीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांचा चांगलाच समाचार घेतला. जालना जिल्ह्यातील मतदारांनी दानवे यांना अनेकवेळा संधी दिली. त्यांच्या मुलाला आमदारकी दिली, मात्र खाऊसाहेब दानवे यांनी जालनाकरांना नेहमी ‘चकवाच’ दिला असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांप्रमाणे दबावतंत्र रावसाहेब दानवे वापरतात. त्यांच्या मतदारसंघातील विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले केले जात आहे. त्यामुळे आता दानवे यांना चकवा देण्याची वेळ आली असल्याचे सुद्धा मुंडे म्हणाले. तर भाजप ही पूर्णपणे भष्ट्राचारात बरबटलेली असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.