मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. मात्र धनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. तसेच गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता असे ही त्यांनी म्हटले आहे.
लंडनमध्ये सुरू असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या अमेरिकन सायबर तज्ज्ञानं ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत हॅकिंग झाल्याचा आणि त्याची कल्पना असल्यानंच मुंडेंची हत्या करण्यात आल्याचंही सूजा म्हणाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील निवडणुकांवेळीही ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा त्यानं केला. ग्रॅफाईट आधारित ट्रान्समीटरच्या मदतीनं ईव्हीएम उघडता येऊ शकतं. याच ट्रान्समीटर्सचा वापर 2014 मध्ये करण्यात आला होता, असं सूजा म्हणाला.