मुंबई - काका-पुतण्याच्या राजकारणासाठी महाराष्ट्रात बीड जिल्हा परिचीत आहे. याच बीडमध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची मैत्रीही सर्वांनाच ठावूक आहे. मात्र या मैत्रीत आता दुरावा आल्याची चर्चा बीडमध्ये सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक घडामोडींपासून संदीप अंतर ठेवून आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यातील राजकारणावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा वचक राहिला आहे. मात्र बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप खुद्द शरद पवार यांनी केले. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर आणि ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अनेकांनी जिल्ह्यातील नेतृत्वाकडे बोट दाखवत पक्ष सोडला होता. तर संदीप क्षीरसागर यांना धनंजय मुंडेकडे पाठबळ देण्यात येत असल्याची तक्रार जयदत्त यांनी पक्षाकडे केली होती. या सर्व स्थितीत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जावून सरकार स्थापन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांच्यासह संदीप क्षीरसागर देखील होते. मात्र शरद पवारांनी आपली भूमिका जाहीर करताच संदीप क्षीरसागर शरद पवारांकडे परतले. तर धनंजय मुंडे नॉट रिचेबल होते.
संदीप यांनी घाई केल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. यात किती तथ्य आहे, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.