MP Amol Kolhe And Dhananjay Munde: महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रात कांद्या निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के कर लावला आहे. त्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील आळेफाट्यावरही शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी एक गोष्ट करून दाखवावी, त्यांना कांद्याचा हार घालून सत्कार करेन, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत हा जो निर्णय घेतला आहे. त्यावर पुनर्विचार करावा. आता २४१० रुपये भाव देत आहेत. आधीच हा भाव कांद्याला का दिला नाही?, अशी विचारणा करत, आम्ही शेतकरी केंद्र सरकारला ठणकावून सांगतो. हा निर्णय मागे घ्या. केंद्र सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तान, श्रीलंका इथल्या शेतकऱ्यांचे भले होणारे आहे. देशातील शेतकऱ्यावर मात्र यामुळे अन्याय होणार आहे, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला आहे.
शेतकऱ्याचे हित जपले तर राज्याचा विकास होणार
सत्ता येते आणि जाते. पण शेतकऱ्याचे हित जपले तर राज्याचा विकास होणार आहे. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे जाऊन ही निर्यात शुल्क मागे घ्यावी. कांद्याला हमी भाव मिळून द्यावा. मी स्वतः कांद्याची माळ घालून आंदोलनात सहभागी झालो. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर कांद्याच्या निर्यातीवर लावलेल्या कराचा विषय मांडवा. मी स्वःत कांद्याचा हार घालून त्यांचा सत्कार करेन, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आजपासूनच सुरू करण्यात येत असल्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली आहे.