बीड: अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे हातात आलेलं पिक गेल्याने शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. यातच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे पुण्याला गेल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले,' अशी टीका पंकजा मुंडेंकडून करण्यात आली होती. त्यावर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, 'यंदाच्या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताही मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्रंदिवस लोकांच्या मदतीसाठी गेलो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढलं. पण, तुम्ही ढगफुटीदरम्यान बीडमध्ये नव्हतात. अनेक दिवस अमेरिकेत गायब होतात. त्यामुळेच तुम्हाला आमच्या कामाबद्दल माहिती नाही', असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, 'तुमच्या मनात शेतकऱ्यांबद्दल चांगल्या भावना असत्या तर मागच्या अतिवृष्टीत तुम्ही बांधावर दिसला असता. बीड जिल्ह्यात नुकसानीबाबत मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडेही भेटीची वेळ मागितली आहे. सरसकट मदत मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे', असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
वर्षातून एकदा मोफत आरोग्य चाचणी, धनंजय मुंडेंकडून घोषणाशरद पवार यांच्या नावानं राज्यातील वृद्धांसाठी आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार बळावतात, त्यासाठी त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असते. या सगळ्यांसाठी हजारो रुपयांची आवश्यकता असते. मात्र अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं त्यांना शक्य होत नाही. असा सगळा विचार करुन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावाने आरोग्य योजना शरद शतम: योजना प्रस्तावित आहे.