Dhananjay Munde Parli Vidhan Sabha 2024: "मला कधी कधी कळत नाही. छोट्या घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्याची काय कुणाला एवढी भीती वाटत असेल?", असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. धनंजय मुंडे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. उमेदवार मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीतील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. याच कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना आहे, असा दावा केला.
लोकसभेला ताईचा गेम केला, आता माझा; धनंजय मुंडे काय बोलले?
धनंजय मुंडे म्हणाले, "मला कधी कधी कळत नाही, छोट्या घरात जन्माला आलेल्या माझ्यासारख्याची काय कोणाला एवढी भीती असेल? तुम्ही सांगा, तुम्हाला भीती नाही ना, मग बाहेरच्यांना का भीती वाटावी, का अशी व्यूहरचना करावी? लोकसभेला ताईचा गेम केला, आता माझा गेम करायचा आहे. ही व्यूहरचना कशासाठी?", असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.
"असं वाटतं की, महाराष्ट्रात काम करणारा एखादा व्यक्ती उद्या त्यांना अडचणीचा ठरू शकतो. म्हणून आत्ताच त्याचा व्यूहरचना करून राजकीय अस्त करा. ही भीती धनंजय मुंडेची नाही. ही भीती जनतेने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची आहे. ती भीती त्यांना आहे", असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडेंनी कोणाचेही नाव न घेतल्याने रोख कुणाकडे याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
माझं नाव संपवेल, पण...; धनंजय मुंडेंचा इशारा
"मला संपवणारा माझं नाव संपवेल. पण, त्या नावाच्या मागे तुमची ताकद आहे; ती ताकद त्यांना संपवावी लागणार आहे. आपल्या मातीच्या या नेतृत्वाला त्यांना संपवावं लागेल. जात-पात, धर्म याचा कधी मी आयुष्यात विचार केला नाही. माझ्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता ज्या दिवशी चालू होईल त्या दिवसापासून राजकारण चालू. ज्या दिवशी मतदान झालं, त्या दिवशी माझं राजकारण संपलं", असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.