बीड : दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, तर मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही, असा शब्द राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये आज कृषीच्या वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
"शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहीत आहे. येत्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रिम जमा केली जाणार आहे. जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही, तर मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही. पिक विम्याच्या बाबतीमध्ये विरोधक मोठ-मोठ्या सभा घेतील अफवा पसरवण्याचं काम करतील. मात्र, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या वेदना मला चांगल्या कळतात" असे धनंजय मुंडे म्हणाले.
याचबरोबर, बदलते हवामान आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेता शेतकऱ्यांनी आता आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे त्याचबरोबर यांत्रिक शेती देखील प्राधान्याने केली पाहिजे. तसेच, शेतीच्या यांत्रिकीकरणाला अधिक पाठबळ देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार, पीक लागवडीपासून २१ ते २५ दिवस पावसाने दडी मारल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पिक विमा रक्कम देण्यात येते.
४० लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप बीडमध्ये २१२ लाभार्थ्यांना शासनाच्या कृषी योजनेत विविध प्रकारचे लाभ मिळाले आहेत. यापैकी ४० लाभार्थ्यांना धनंजय मुंडे यांच्या हस्ते ट्रॅक्टरच वाटप करण्यात आले. दरम्यान, लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करत असताना धनंजय मुंडे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद सुद्धा घेतला.