तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 09:23 IST2025-04-03T09:21:47+5:302025-04-03T09:23:52+5:30
Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल.

तब्येतीचं कारण सांगत अजित पवारांच्या कार्यक्रमाला मुंडेंची 'दांडी', पण मुलीच्या फॅशन शोला मात्र उपस्थिती; चर्चांना उधाण
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर होते. पण, अजित पवार यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे तब्येतीचे कारण देत अनुपस्थित राहिले. मात्र, ते एकदिवस आधीच (मंगळवारी) रात्री उशिरा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या एका फॅशन शोच्या कार्यक्रमात पत्नी राजश्री मुंडे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे दिसून आले. या फॅशन शोमध्ये त्यांची मुलगी वैष्णवी हिने सहभाग घेतला होत. या कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यानंतर आता, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि योजनांचा आढावा घेताल. मात्र, त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे नव्हते. आपली प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने, काल उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. यामुळे आपण उपमुख्यमंत्र्यांच्या बीड दौऱ्यादरम्यान उपस्थित राहू शकणार नाही, अशी पोस्ट मुंडे यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली होती.
धनंजय मुंडेंची पोस्ट -
आमदार धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले होते, "उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. मात्र, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी @Mahancpspeak पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती." असे मुंडे यांनी म्हटले होते.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaks साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 2, 2025
दरम्यान, संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल.
महत्वाचे म्हणजे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या या दोऱ्यादरम्यान मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धसहे उपस्थित होते.