मुंबई : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांचा मेळावा आहे. आज सकाळी 11 वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या समर्थकांशी संवाद साधणार आहेत. तसेच, गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाजपा, शिवसेनेचे नेते येणार असल्याचे समजते.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. ‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा… जनसामान्यांच्या कल्याणाचा… सदैव आपल्या आठवणीत! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन’ असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
याचबरोबर, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही वाढदिवसानिमित्त ट्विटरवरुन अभिष्टचिंतन केले आहे. "जनसामान्यांचे नेतृत्व, तरुणाईचे आदर्श, शेतकऱ्यांचे कैवारी, राजकारणातील मानबिंदू पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेब, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैजनाथाच्या चरणी प्रार्थना!" असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.
दरम्यान, गोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाजपाचे कार्यकर्ते हे परळीकडे निघाले आहेत. समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येथे नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने गोपीनाथ गडावर जय्यत तयारी केली आहे. तसेच, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादानाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य, त्यांच्या विचाराची प्रेरणा व उर्जा भावी पिढीला मिळावी म्हणून वैद्यनाथ कारखाना परिसरात १२ डिसेंबर २०१४ रोजी गोपीनाथ गडाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर १२ डिसेंबर २०१५ रोजी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले होते.