Manoj Jarange Patil ( Marathi News ) : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे राज्यात धनगर समाजाचेही आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. दरम्यान, आता दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने धनगर आरक्षण मिळण्यात असलेला अडथळा दूर केला. राज्यात आता धनगड असा उल्लेख असलेली ७ प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. यामुळे धनगरांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. यावरुन आता मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सवाल उपस्थित केले आहेत.
"तुम्ही आता आमची फसवणूक केली ती तुम्हाला महागात पडणार आहे. धनगर समाजाचा घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे. सहा नोंदीवर जर त्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होत असेल तर आमच्या ५७ लाख नोंदी आहेत. मग आमच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा का होत नाही?, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केला.
"आमचं ८३ व्या क्रमांकाला कुणबी आहे, कुणबी आणि मराठा एक आहे. हे कसं काय होत नाही. त्यांचं होत असेल तर आमचा पाठिंबा आहे. गोरगरीब धनगर बांधवांना एसटी आरक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. या मताचे आम्ही स्वागत केले. हे गोरगरीबाला मिळालं पाहिजे. फक्त निवडणूक काळात हूल देऊ नका, आता याची अंबलबजावणी करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. "आता राजकीय वर्तुळात आणि ग्रामीण भागातही अशी चर्चा आहे की, यांनी फक्त मार्ग मोकळा केला आहे असं सांगत आहेत. ही अंबलबजावणी करणार नाहीत. निवडणूक झाली की हेच यांचा वकील कोर्टात पाठवणार आणि सांगणार आम्ही मार्ग मोकळा केला होता पण कुणीतरी कोर्टात गेलं त्यामुळे हा विषय न्यायालयात अडकला. हे सगळं धनगर समाजाला कळते. हा समाजही गेल्या दहा वर्षापासून याची वाट पाहत आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला इशारा
"आदिवासी समाजाचा विरोध पत्कारुन त्यांनी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाजाच ४६ विधानसभा मतदारसंघात निर्णायक मतदान आहे. त्यांच्याविरोधात हा निर्णय ते घेऊ शकत नाही. जर हा निर्णय झाला तर आमचा त्याला पाठिंबा आहे. पण आता मराठे जागे झाले आहेत न होणार काम तुम्ही केलं आहे. मग आमचं ओबीसी, मराठा कुणबी एक आहे मग हे कसं काय होत नाही? तुम्ही हे कसं करत नाही हे आम्ही पाहतो, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.