Gopichand Padalkar Mahayuti : धनगर समुदायातून येणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महायुती सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू असतानाच आमदार गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्रभर रास्ता रोको करण्याची हाक दिली आहे. सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप पडळकरांनी केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाज आक्रमक झाल्याने त्यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे राहिले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, "सरकारवर भरोसा आहे. भरोसा नसण्याचे कारण नाही. आम्ही सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करतोय. पण, सरकारला चुकीची माहिती देण्याचे किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काही प्रयत्न महाराष्ट्रातून होत असतील, तर धनगर समाज गप्प बसणार नाही", असा आरोप पडळकरांनी केला.
गोपीचंद पडळकरांचे आदिवासी समाजाला आवाहन काय?
"आज आदिवासी जमातीतील लोकांना आम्ही हात जोडून विनंती करतोय की, सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्णय दिलाय, जातीचे उपवर्गीकर करा आणि त्यात तुमचे ए करा. जे आदिवासी आहेत. ज्यांना आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळतो, त्यांना ए करा आणि धनगरांना बी करा. तुमचे सात टक्क्याचे आरक्षण सुरक्षित राहू द्या", असे पडळकर म्हणाले.
"तुमचे राजकीय प्रतिनिधीत्व, तुमचे शिक्षणातील, तुमचे नोकरीतील आणि तुमच्यासाठी जे बजेट येते; ते स्वतंत्र राहील. तुमच्या लोकसंख्येप्रमाणे येईल. आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे आता जे ३.५० टक्के आरक्षण आहे. तेवढेच द्या. जेव्हा केव्हा जनगणना होईल, त्यामध्ये धनगरांची संख्या पोटजातींसह मोजल्यानंतर त्यांची आकडेवारी निश्चित होईल. त्या आरक्षणाचा विषय वेगळा राहील", अशी भूमिका पडळकरांनी आंदोलनाची हाक देताना मांडली.
राज्यभर रास्ता रोको करण्याची हाक
"महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की, तुम्ही ताकदीने सोमवारी (२३ सप्टेंबर)... राज्य सरकारला आपलीही ताकद दाखवण्याची गरज आहे. तु्म्ही सोमवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करा", असे आवाहन पडळकर यांनी राज्यातील धनगर समुदायाला केले आहे.
विधानसभेला आरक्षणाचा मुद्दा कळीचा
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेली मागणी पूर्ण करणे, सरकारसमोर सगळ्यात मोठी अडचण बनली आहे. कायद्याच्या चौकटीत सगेसोयरेची मागणी पूर्ण अशक्य आहे, असे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. पण, मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
दुसरीकडे ओबीसी समाजाचा जरांगेंच्या मागणीला कडाडून विरोध होत आहे. या संघर्षाचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये बसला. आता धनगर विरुद्ध आदिवासी असा मुद्दा समोर आला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यास आदिवासी समाजाचा विरोध आहे. आदिवासी समुदायातून येणारे आमदारही याविरोधात आक्रमक आहेत.
अनेक विधानसभा मतदारसंघात धनगर समाज आणि आदिवासी मतदारांची भूमिका निर्णयाक आहे. त्यामुळे या दोन्ही समुदायांची नाराजी दूर करण्याचे आव्हान सत्ताधारी म्हणून महायुतीसमोर असणार आहे.