चेतन धनुरे
धाराशिव : विधानसभा असो की लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघात मागच्या २० वर्षांपासून पाटील-राजेनिंबाळकर घराण्यातच फाईट झाली आहे. दोन पिढ्यांपासून भावाभावातील लढतीच्या डिट्टो फिल्मी क्लायमॅक्समध्ये यंदा ऐनवेळी ट्वीस्ट आला अन् भाऊ विरुद्ध भाऊ ऐवजी दीर-भावजयीत लढतीची पटकथा लिहिली जातेय.
२००४ सालच्या विधानसभेला डॉ.पद्मसिंह पाटील यांना त्यांचे चुलतबंधू पवनराजे यांनी तगडी लढत दिली होती. या दोघांतील कौटुंबिक, राजकीय कलहाचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीतील राणाजगजितसिंह पाटील व ओम राजेनिंबाळकर यांनी आजवर कायम राखला. आता यावेळी मात्र, ओमराजेंना राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी आव्हान दिले आहे. आजवरचा इतिहास पाहता ही लढत पुन्हा एकदा अत्युच्च टोकाची होण्याची चिन्हे असून, वंचित बहुजन आघाडीमुळे यात भर पडली आहे. यंदाचा पराभव कोण्या एकाला विजनवासात घेऊन जाणारा असल्याने दोन्हीकडे जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे.
फोन अन् कामांवरुन आरोप-प्रत्यारोपांची राळमहायुतीकडे लोकसभा क्षेत्रातील सहापैकी पाच आमदार आहेत. मदतीला माजी मंत्रीही आहेत. खा.ओमराजे यांची भिस्त ही एक आमदार, तीन माजी आमदार व कार्यकर्त्यांवर आहे. महायुतीकडून खासदारांची कामे काय असतात, त्यांनी पाच वर्षांत काहीच केले नाही, मोदींमुळे मतदारसंघातील कामे मार्गी लागल्याचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. तर ओमराजेही आपण प्रत्येक व्यक्तीचे फोन घेऊन त्यांची कामे करतो असे सांगतानाच केलेल्या कामांची यादी सभांमधून वाचत आहेत. कामांवरुन होणारे आरोप-प्रत्यारोप आता वैयक्तिक पातळीवर पाझरु लागले आहेत. दुसरीकडे वंचितचे उमेदवार आंधळकर दोघांवरही घराणेशाहीचा आरोप करीत दंड थोपटून उभे आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मी सर्वांचेच फोन उचलतो, कामे करतो, असा दावा खा. ओमराजे करतात. तर विरोधक खासदारांना विकास कामांवरुन प्रश्न उपस्थित करतात.कृष्णेचे पाणी, तुळजापूर रेल्वे, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाचे भाव, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, रस्त्यांचे जाळे, कृषी सिंचन, सौर उर्जा.घराणेशाही तसेच संपत्तीवरुन उमेदवारांत होणारे आरोप-प्रत्यारोप, कमिशन-हप्ता वसुलीचाही होतोय सातत्याने आरोप.
गटातटाचा काय होणार परिणाम? महायुतीत जागा अजित पवार गटाला सुटल्याने शिंदेसेना नाराज आहे. त्यांचे पदाधिकारी प्रचारात कितपत सक्रीय होतात, यावर बरीच भिस्त आहे. महाविकास आघाडीत गटबाजी दिसत नाही. मात्र, उद्धवसेना विश्वासात घेत नसल्याची खंत मित्रपक्ष खासगीत सांगतात.
२०१९ मध्ये काय घडले?ओम राजेनिंबाळकर शिवसेना (विजयी) ५,९६,६४० राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस ४,६९,०७४ अर्जुन सलगर वंचित बहुजन आघाडी ९८,५७९नोटा - १०,०२४