मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर १ मधील चाळी आणि इमारतींतील रहिवाशांना, डीआरपी प्रकल्पात ४०५ चौरस फूट घरे देण्यावर सरकार ठाम असल्याच्या निषेधार्थ, धारावीकरांनी माटुंगा लेबर कॅम्प येथून समतानगर ते बालिगानगरपर्यंत मेणबत्ती मोर्चा काढला. डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती संघाच्या नेतृत्वाखाली हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. याच आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून आता १४ जून रोजी आझाद मैदानातही मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर १ मधील माटुंगा लेबर कॅम्पमधील इमारती, चाळी आणि शाहूनगर, बालिगानगर, गीतांजलीनगर, आर.पी. नगरमधील रहिवाशांना विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शिवाय, ७५० चौरस फुटांच्या घरांच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत, रेल्वेलगतच्या वगळण्यात आलेल्या झोपड्यांनाही पुनर्विकासात सामावून घ्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
धारावीत मेणबत्ती मोर्चा
By admin | Published: June 10, 2016 2:26 AM