नांदेड : राज्यात पेट्रोलच्या दराने अखेर शंभरी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एक लिटर पेट्रोलसाठी १०० रुपये २९ पैसे तर डिझेलसाठी ८९ रुपये ६३ पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे शेजारील तेलंगणामध्ये मात्र पाच रुपयांनी इंधन स्वस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा फटका अर्थातच सर्वसामान्यांना बसत आहे. नांदेड शहरात हे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. तर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या धर्माबादेत मात्र पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. राज्यात मुंबई, मनमाड, धुळे, अकोला, चंद्रपूर, खापरी, सोलापूर या ठिकाणाहून पेट्रोल आणि डिझेल वितरित केले जाते. नांदेडला सोलापूर येथील डेपोतून इंधन पुरवठा केला जातो. सोलापूर ते धर्माबाद हे अंतर सर्वात जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो. पर्यायाने पेट्रोल आणि डिझेल या ठिकाणी जिल्ह्याच्या इतर भागाच्या तुलनेत अधिक महाग मिळते. शेजारील तेलंगणामध्ये हैदराबाद येथून इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे तिथे पाच रुपये कमी दराने पेट्रोल मिळते.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादेत पेट्रोलच्या दराने ओलांडली शंभरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 3:19 AM