- सतीश शुक्ल(अध्यक्ष श्री गंगागोदावरी पंचकोटी (पुरोहित) संघ)जेव्हा बृहस्पती (गुरू) आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात, तो काळ सिंहस्थ महाकुंभपर्व म्हणून मानला जातो. स्कंद पुराणातील वर्णनानुसार दक्षिण वाहिनी गोदावरी नाशिकमध्ये पंचवटीत असून, या पवित्र पर्वासाठी विश्वातील सर्व नद्या, सागर, परम तपस्वी ऋषी, महर्षी साधू-संत आणि ३३ कोटी देवता गोदावरी नदीच्या तीरावर वास्तव्यास येतात. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सिंहस्थ ध्वजारोहण संपन्न होत आहे. सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होत आहे, याची उद््घोषणा करण्यासाठी धर्मध्वजारोहणाचे वेगळे महत्त्व आहे. ध्वजारोहण ही पुरातन परंपरा आहे. यंदाही गुरू ग्रह सिंंह राशीत प्रवेश करणार असून, १४ जुलै रोजी सकाळी ६.१६ वाजता या मुहूर्तावरच ध्वजारोहण होईल, तर सिंंहस्थ महापर्वाची सांगता ११ आॅगस्ट २०१६ रोजी होणार असून, त्यावेळी ध्वजावतरण होणार आहे.नाशिकमध्ये पुरोहित संघाच्या वतीने ध्वजारोहण करण्याची मोठी परंपरा आहे. अत्यंत पुरातन परंपरेत साधू-महंत सहभागी होत असतात. रामकुंडावर गंगागोदावरीची दोन मंदिरे आहेत. मगर आणि अमृत कुंभ असलेला फलक हा ७ बाय ३ फुटांचा असून, तो रामकुंडावरच वस्त्रांतरगृहाखाली असलेल्या गंगागोदावरी मंदिरासमोर उभारला जातो. तसेच दुसऱ्या गंगागोदावरी मंदिरावर १५ बाय साडेचार फूट आकाराचा ध्वज उभारण्यात येणार आहे. या ध्वजाची वैशिष्टे आहेत. त्याचा आकार, त्यावरील अमृत कुंभ, सिंह आणि मगर अशा अनेकांची वैशिष्टे सांगण्यात येतात. धर्मध्वज निर्माण करताना जेवढे उभे आडवे तंतू ध्वजनिर्मितीत वापरले जातात, त्या संख्येनुसार हजारो वर्षे यजमानास स्वर्ग फल प्राप्त होते, असे मानले जाते. या दिव्य धर्मध्वजाची प्रदक्षिणा करतात, त्यांना जीवनातील सकल ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच ध्वजाची संस्थापना केलेल्या ठिकाणची माती (रज:कण) जे भक्तिभावाने धारण करतात, त्यांच्या सप्तजन्माच्या पातकांचा नाश होतो, असे मानले जाते. असे ध्वजारोहण ज्या भूमीवर केले जाते त्या राष्ट्रावर आपत्ती येत नाही, असे मानले जाते.
धर्मध्वजारोहण म्हणजे सिंहस्थ पर्वाच्या प्रारंभाचा शंखध्वनी
By admin | Published: July 12, 2015 3:27 AM