नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघातील लढत चर्चेत होती. या ठिकाणी बाप विरुद्ध बेटी अशी लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम-हलगेकर रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यानंतर बाप अखेर बाप असतो, अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली. त्यानंतर आता त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर "बाप आखिर बाप होता है" असे बॅनर लागले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांची कन्या भाग्यश्री यांचा पराभव केला. त्यानंतर मोठा जल्लोष धर्मरावबाबा आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुलगी व वडिलांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे शेवटी विजयानंतर "बाप आखिर बाप होता है", हा संदेश धर्मरावबाबा आत्राम यांच्या होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भाग्यश्री यांना दिला आहे. "बाप आखिर बाप होता है", धर्मरावबाबा आत्राम यांच्या विजयानंतर त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर लागलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांना मुलगी भाग्यश्री यांनी बंड करून आव्हान दिल्याने अहेरी विधानसभेत वादळ उठले होते. शरद पवार गटाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अंबरीश आत्राम, अशी तिरंगी लढत झाली. प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे अहेरीकडे लक्ष लागले होते. अखेर धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग्यश्री आत्राम व पुतणे अंबरीश आत्राम यांना पराभूत करुन गड शाबूत ठेवला. धर्मरावबाबा आत्राम १६ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.