'मुलीला नदीत बुडविणार'च्या धमकीनंतरही आत्रामांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार; तारीख ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:36 PM2024-09-09T15:36:05+5:302024-09-09T15:37:09+5:30
धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला न सोडण्याची धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते.
अजित पवारांचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या गटातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मुलीला नदीत टाकेन अशी धमकी आत्राम यांनी दिली होती. या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्राम हलगीकर या शरद पवार गटात प्रवेश करण्याची तारीख नक्की झाली आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांनी जावई आणि मुलीला न सोडण्याची धमकी दिली होती. जी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल, असा सवाल करत शरद पवार गटातून आपलीच मुलगी आपल्याविरोधात उभी राहणार असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले होते. यामुळे विधानसभेला वडील विरुद्ध मुलगी अशी लढाई रंगणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले होते.
माझ्याकडे दुधारी तलवार असून माझ्या वाटेला गेला तर ती म्यानातून बाहेर काढेन, असे वक्तव्य आत्राम यांनी केले होते. आमचे घराणे हलगेकरांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे मुलीचे सासरचे आडनाव घेऊन आत्राम यांनी धमकी दिली होती.
येत्या १२ सप्टेंबरला भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवारांची शिवस्वराज्य यात्रा १२ सप्टेंबरला अहेरीत येणार आहे. यावेळी भाग्यश्री शरद पवार गटात प्रवेश करतील. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा होती.
भाग्यश्रीवरून घर फोडू नका, मी घर सोडून चूक केली, असा अनुभवाचा सल्ला भाग्यश्रीला दिला होता. वडील आणि अजित पवारांच्या समजावण्यावरूनही भाग्यश्री हलगेकर यांनी आपला निर्णय कायम ठेवला आहे.