मुंबई - धर्मवीर आनंद दिघे सिनेमा काढला. तुम्हाला आवडला पण काही लोकांना पचला नाही. त्याचाही राग होता. कुणाला आवडो न आवडो मी पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांनी बाळासाहेंबांना गुरू मानलं. आज आम्ही बाळासाहेबांचे, धर्मवीरांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आम्ही हा निर्णय का घेतला त्याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा गद्दार, बंडखोर म्हटलं जातं. हा बंड नव्हे, उठाव आहे, क्रांती आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात. धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे, पालघर जिल्ह्यात इतिहास घडवला. दिघेंनी उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवलं. योग्यवेळी सगळं काही सांगेन असा त्यांनी सांगितले.
त्याचसोबत कामाख्या देवीने महाविकास आघाडीचा बळी दिला. देवीलाही ते आवडलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला आवडलं नाही. कामाख्या देवीच्या मंदिरात गेलो होतो. आम्ही सगळे एका रांगेत होतो. तेव्हा रांगेतील एक मुलगी म्हणाली काय डोंगर, काय झाडी. शहाजीबापू इतके प्रसिद्ध झालेत. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण गुवाहाटीत होते. शहाजीबापूंच्या कलागुणांना वाव मिळाला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी चांगला पाहुणचार केला. १५ दिवसांच्या त्या अनुभवावर सिनेमा निघू शकतो. आमच्याकडे चर्चा करायला माणसं पाठवली, इकडे पुतळे जाळत होते, पदावरून हटवत होते. दगडफेक करायला सांगितलं पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करायला पुढे कोण येणार? एकनाथ शिंदे यांनी मधमाशासारखी माणसं जोडली आहेत. ती सोडली तर पळताभुई थोडी होईल असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
पांडुरंगाची पूजा करण्याचं भाग्य मिळालंमी दिल्लीहून पुण्यात उतरलो, पंढरपूरला चाललो होतो तेव्हा रस्त्याच्या शेजारी दुतर्फा स्वागतासाठी लोकं जमली होती. आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करण्याचा मान मला मिळाला हे भाग्याचं आहे. आपण जी विकासाची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका घेतली त्याला लोकांनी साथ दिली. पंढरपूर देवस्थान तिरूपती बालाजीसारखं झाल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरचा विकास आराखडा बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.