महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेतील एक मोठे नाव असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्यावरील धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट अतिशय गाजला. यामध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याची माहिती आहे. मात्र, यानंतर काहीच दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या बंडाची बातमी आली. यावरून निर्माते मंगेश देसाई यांना धर्मवीर २ मध्ये एकनाथ शिंदे यांचे बंड दाखवणार का, असा सवाल करण्यात आला.
धर्मवीर चित्रपटात ठाणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट करण्यात आल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार चित्रपटाच्या प्रिमिअरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मधूनच निघून गेले होते. आनंद दिघे यांच्या मृत्युचा सीन बघता येणार नाही, असे कारण त्यांनी दिले होते. मात्र वास्तविक उद्धव ठाकरे यांना चित्रपटातील काही सीन्स खटकले असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा हा सिनेमा कारण ठरतो आहे का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांना धर्मवीर हा बंडाचा ट्रेलर होता का? असा प्रश्न विचारण्यात आला.
धर्मवीर २ मध्ये एकनाथ शिंदेंचं बंड दाखवणार का?
धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांना धर्मवीर २ या चित्रपटात शिंदे यांचे बंड दाखवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, जेव्हा आम्ही धर्मवीर चित्रपटाचे प्रदर्शित होण्याच्या अगोदर फायनल स्क्रीन एकनाथ शिंदे यांना दाखवले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितले होते की, यातील बऱ्याच गोष्टी वाढत आहेत. तुम्ही एवढे दाखवू नका. हे योग्य नाही. पण स्क्रीप्टनुसार आम्हाला काही गोष्टी दाखवणे गरजेचे होते. त्यामुळे त्या दाखवल्या गेल्या. आता असे झाले की, हे सगळे योगायोगाने घडले आहे आणि याचे कनेक्शन या सिनेमासोबत जोडले जाते आहे, असे देसाई यांनी सांगितले.
धर्मवीर हा बंडाचा ट्रेलर होता का?
धर्मवीर हा बंडाचा ट्रेलर होता का? यावर बोलताना देसाई म्हणाले की, मला असे वाटते हा योगायोग आहे, हा सिनेमा तयार करत असताना अशी कुठलीही गोष्ट मनात नव्हती. माझी शिंदे साहेबांशी जेव्हा भेट व्हायची तेव्हा ते याबाबत जास्त बोलले नव्हते. किंबहूना त्यांच्या बोलण्यातून असे जाणवलेही नाही, असे मंगेश देसाई म्हणाले.
दरम्यान, धर्मवीर पार्ट २ मध्ये आता जे काही घडते आहे हे किती असेल हे आता आम्ही सांगू शकत नाही. पार्ट २ चा जो स्क्रीन प्ले होता, पार्ट २ ची जी कथा होती. ही परत दिघे साहेबांच्याच अनुशंगाने होती. दिघे साहेबांचं आत्मचरित्र्य हे तीन तासांत संपणारे नाही. त्याला अनेक तास लागून शकतात. अजून अनेक सीन्स आमच्याकडे आहे जे पार्ट २ मध्ये येतील. मुळात धर्मवीर पार्ट १ इतका यशस्वी झाला आहे की, लोकांना मुळात दिघे साहेब अजून कसे होते. याबाबत पार्ट २ बघण्याची इच्छा आहे, असे मंगेश देसाई यांनी म्हटले आहे.