धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात सोडला, प्रणिती शिंदेंवर आरोप करत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 22:16 IST2024-12-10T22:15:42+5:302024-12-10T22:16:20+5:30
Dhavalsinh Mohite Patil Resigns : सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला.

धवलसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसचा हात सोडला, प्रणिती शिंदेंवर आरोप करत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
Dhavalsinh Mohite Patil Resigns : सोलापूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्ष मोठा की सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे मोठ्या? रक्ताचे पाणी करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न पडला आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली तर त्यासाठी काम करणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आम्ही काम करू शकणार नाही, असे म्हणत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्यात दारूण पराभव झाला. यानंतर आता धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरात काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले असून त्यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला.
प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला, त्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. या पाठिंब्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाराजी झाली. काँग्रेस पक्षाने आमच्याशी धोका केला, अशी बदनामी देखील झाली. यामुळे मतदारांमध्ये आक्रोश निर्माण झाला, असे धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसचे सभासद नसतानाही आणि तिकीट मागितले नसतानाही भगिरथ भालके यांना तिकीट देण्यात आले. पंढरपूर- मंगळवेढामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय झाला. सोलापूर दक्षिणमध्ये पक्षाच्या उमेदवाराला डावलून अपक्षाचं काम करण्याचे आदेश सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी दिले. पण त्याचे डिपॉजिटही वाचले नाही, असे धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस नसून शिंदे काँग्रेस झाली आहे. अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचे काम करण्यात कार्यकर्त्यांस अडथळे येत आहेत. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करणार हे चित्र समोर दिसत असल्यामुळे कार्यकर्त्यांवरील अन्याय मी पाहू शकत नाही. म्हणून मी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे पत्रात मोहिते यांनी नमूद केले आहे.