धीरज-अमित यांच्या उमेदवारीने देशमुख कुटुंबीयांची 'ही' परंपरा राहणार कायम ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:24 PM2019-10-07T15:24:10+5:302019-10-07T15:24:30+5:30
अमित आणि धीरज यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत उपस्थित होता. तर अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी रितेश हजेरी लावताना दिसत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आता प्रचारसभा सुरू असून भेटीगाठींवर उमेदवार भर देत आहेत. लातूरमध्ये एकाच कुटुंबातील दोघं सख्खे भाऊ अर्थात अमित देशमुख आणि धीरज देशमुख विधानसभेच्या रिंगणात असून या दोघांना आमदार करण्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहे. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांना आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे. अर्थात यासाठी मतदारांच्या पसंतीवर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
अमित आणि धीरज यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासोबत उपस्थित होता. तर अनेक ठिकाणी सभा घेण्यासाठी रितेश हजेरी लावताना दिसत आहे. तर मातोश्री वैशालीताई देशमुख देखील आपल्या दोन्ही लेकांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.
धीरज तुमच्या कुटुंबातील आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे तो तुमची काळजी घेईल, असं लातूर ग्रामीण मतदार संघातील एका कार्यक्रमात वैशाली देशमुख म्हणाल्या. तर दिलीप देशमुख देखील आपल्या पुतण्यांसाठी प्रचार सभा घेत आहेत.