मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. सीतारमण यांनी केलेलं अर्थसंकल्पीय भाषण हे इतिहासातील सर्वात दीर्घ लांबीचं ठरलं आहे. तर सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार धीरज देशमुख यांनी केला आहे.
धीरज देशमुख म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रचंड निराशाजनक आहे. कागदोपत्री आकड्यांचा मेळ घालून सादर केलेला अर्थसंकल्प परिणामशून्य असून, शेतकरी वर्गाला पुन्हा एकदा दुय्यम स्थान देण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तर शेती उत्पादन दुप्पट करणार, असे सांगणारे केंद्र सरकार प्रत्यक्षात उत्पन्न वाठीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. सरकारने लोकप्रिय घोषणा केल्या असल्या, तरी त्यासाठी निधी कसा उपलब्ध करणार, हा प्रश्न अनुतरित आहे. केंद्रातील भाजप सरकार त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांचे खाजगीकरण करुन देशाला मागे घेऊन जात असल्याचेही यावेळी ते म्हणाले.