औरंगाबाद - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे अनेकांचा संसार रस्त्यावर आला. तर पूरग्रस्तांची खाण्यापिण्याचे वांधे झाले आहेत. परंतु, या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. प्रशासकीय सेवेत नुकत्याच रुजू झालेल्या एका अधिकाऱ्याने आपल्या साखरपुड्याचा खर्च वाचवून आणि मित्र परिवारातून जमलेल्या एकूण रकमेतून १०३ पूरग्रस्त कुटुंबीयांना मदत केली.
जेहुर आडगाव येथील रहिवासी धीरज चव्हाण हे मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदी असून त्यांनी हरिपूर (ता. मिरज) येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी स्वतःच्या साखरपुड्यातून १० हजार आणि मित्रांकडून ३० हजार रुपये जमा करून हरिपूर येथील १०३ पूरबाधित कुटुंबांना भांडी वाटप केली.
हरिपूर हे प्रेक्षणीय ठिकाण असून कृष्णा-वारना संगमावर वसलेले आहे. गावातील १५० कुटुंबांची घरं पुरामुळे उध्वस्त झाली आहेत. यापैकी १०३ कुटुंबांना भांडी वाटप करण्यात आली. प्रत्येकी ३ पातेले, एक ताट, चमचे एक गाळणी अशा स्वरूपात ही मदत होती. हरिपूर गावचे सरपंच विकास हणभर यांनी यासंदर्भात धीरज चव्हाण आणि हर्षवर्धन मगदूम यांना प्रशस्तीपत्र सोपविले.
आम्ही पूरग्रस्तांना केलेली मदत अल्प होती. त्यांना संसार पुन्हा उभारण्यासाठी आणखी मदतीची गरज आहे. परंतु, आम्ही दिलेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर समाधान होते. तसेच आम्हाला देखील मदत केल्याचा आनंद झाल्याचे धीरज चव्हाण यांनी सांगितले.