उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:18 PM2019-09-04T15:18:57+5:302019-09-04T15:20:52+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघात मोठ्याप्रमाणात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख सुद्धा काँग्रेस पक्षाकडून रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठे आव्हान असणार असल्याचे बोलले जात आहे. कारण विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे व माजी आमदार वैजनाथ शिंदे हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान असणार आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघ २००९ च्या पुनर्रचनेत तयार झाला आहे. लातूर जिल्ह्यात १९८० पासून देशमुख कुटंबाचे वर्चस्व राहिलं आहे. २००९ मध्ये पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून वैजनाथ शिंदे यांनी या मतदारसंघाचे पहिले आमदार बनण्याचा मान मिळवला. पुढे २०१४ मध्ये मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. तर त्यांच्या जागी विद्यमान आमदार असलेले त्र्यंबक भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली व त्यांचा विजय सुद्धा झाला.
आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि भिसे हे आजी-माजी आमदार निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहे. मात्र धीरज देशमुख सुद्धा याच मतदारसंघातून रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे धीरज त्यांनी यासाठीच याच भागातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला शिंदे वर भिसे यांचे आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मांजरा नदीच्या पट्यात उस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मांजरा,विकास,रेणा साखर कारखान्यांच्या ग्रामीण भागावर प्रभाव आहे. त्यामुळे येथील आर्थिक हितसंबंध देशमुख परिवाराच्या राजकरणाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे धीरज यांना याचा फायदा होऊ शकतो. मात्र पक्षातील इच्छुकांची नाराजी करून मिळवलेली उमेदवारी त्यांना धोक्याची ठरू शकते. त्यामुळे उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्यात धीरज देशमुख किती यशस्वी ठरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.