लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करूनही ती अद्याप दिलेली नाही, याचा जाब विचारण्यासाठी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेवर सेनेने ‘ढोल बडवा’ आंदोलन केले.मातोश्रीच्या आदेशानुसार हे आंदोलन राज्यभर करण्यात आले. आनंदआश्रम येथून सुरू झालेल्या या आंदोलनातील शिवसैनिक स्टेशन रोडने ढोल वाजवत टीडीसीसी बँकेवर धडकले. बँकेच्या प्रवेशद्वारावर ढोल वाजवणाऱ्या शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांना भेटून कर्जमाफीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांच्या यादीची मागणी केली. मात्र, कर्जमाफीचा लाभ देणारे निकष अद्यापही मिळाले नसल्याने एक पैसाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला नाही, असे पाटील यांनी शिष्टमंडळाला स्पष्ट सांगितल्याचे सेनेचे जिल्हा प्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील यांनी सांगितले. या आंदोलनात पक्षाचे ठामपा सभागृह नेते व सेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार शांताराम मोरे, पालघरचे उत्तम पिंपळे, वसईचे शिरीष चव्हाण, महिला आघाडीप्रमुख रश्मी निमसे, सेना विभागप्रमुख विजय चव्हाण, आदींनी सहभाग घेतला.
कर्जमाफीसाठी सेनेचे टीडीसीसीवर ‘ढोल बडवा’
By admin | Published: July 11, 2017 4:09 AM