मुंबई: धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी 60 आणि 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या.
अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.