- ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 30 - साक्री तालुक्यातील पानखेडा शाळेतील संगणक व इतर साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना पिंपळनेर पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. तसेच दुसऱ्या एका कारवाईत आमळी येथे अवैध दारू अड्डयावर पिंपळनेर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
साक्री तालुक्यातील पानखेडा येथे गेल्या आठवड्यात दीपरत्न माध्यमिक विद्यालयातून खिडकीचे गज तोडून कॉम्प्युटर मॉनिटर व इतर साहित्य चोरण्याची घटना घडली होती. यासंदर्भात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी अवघ्या आठ दिवसात लावला असून मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाच आरोपींना अटक केली आहे.
त्यात चंदर वामन देसाई (२३), ताराचंद भीमसिंग देसाई (१९), मन्साराम ऊर्फ मन्शा हरिवल बोरसे (२०), श्रावण ऊर्फ सावन सुरेश मालसुरे (२०) व एक अल्पवयीन युवक (१६, रा. सर्व चिंचपाडा) यांना संगणकासह ३० हजार रुपये किमतीचे साहित्य व एक टाटा मॅजिक गाडीसह (क्रमांक एम.एच.१८ ए. जे. ३६२०) पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी केली.
बेकायदेशीर दारू अड्डयावर धाड
आमळी येथील श्रीकन्हैयालाल महाराज मंदिर येथे श्रावण मासानिमित्त पेट्रोलिंग करित असताना तेथे जवळ विसपुते वस्तीत राहणाऱ्या धवळू दहिल्या चौधरी (रा. आमळी) याच्या घरात बेकायदेशीर रित्या देशी दारू व गावठी दारू विक्री असल्याबाबत पिंपळनेर पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून धवळू दहिल्या विसपुते यांना ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ८९ देशीच्या क्वार्टर, १५० लीटर गावठी हातभट्टीची दारू, दारू बनविण्यासाठी तयार करण्यात येणारे रसायन, ३ प्लास्टीक ड्रम प्रत्येकी व १०० लीटर दारू असे एकूण १५,२१७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५ (ई) (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र रणधीर, ललित पाटील, विश्राम पवार, युवराज पवार, शरद चौरे, आनंद चव्हाण, योगेश खटकळ, एस. एच. पठाण, धनंजय मोरे, राजेंद्र खैरनार, गणपत अहिरे, गणेश मुजगे, दीपक गायकवाड, भूषण वाघ, नागेश सोनवणे, सुनील साळुंखे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुशीलाबाई बोरसे यांनी केली.