अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून मोठ्या आमदारांच्या गटासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. याला आता जवळपास आठवडा होऊन गेला आहे. मात्र, तरीही पवारांसह मंत्र्यांना खातेवाट झालेले नाहीय. असे असताना आजच्या धुळ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात राष्ट्रवादीचा झेंडा नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत कारण सांगितले आहे.
हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आज मी आणि देवेंद्र यांनी शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. या वर्षात एवढे निर्णय घेतले. अजित पवार इथे आहेत. त्यांनी सांगितले की मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास होईल. देशाचे नाव जगात अभिमानाने घेतले जातेय, ते मोदींमुळेच. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून अजित पवार आणि त्यांचे आमदार सोबत आले. यामुळे सरकारची ताकद वाढली आहे, असे शिंदे म्हणाले.
आमची युती २५ वर्षांची. यामुळे शिवसेना भाजपाचे झेंडे लागलेले आहेत. पण तुमचा राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला वेळ लागतो. पण पुढच्या कार्यक्रमांत तिन्ही पक्षांचे झेंडे नक्की लागतील. शेवटी आपला विकासाचा त्रिशूळ आहे. म्हणून या त्रिशुळामुळे समोरच्या विरोधी पक्षाला जी काही धडकी भरलीय, पायाखालची वाळी सरकलीय. जिकडे बघावे तिकडे आपल्या सरकराला पाठिंबा देणारी जनता पहायला मिळत आहे. यामुळे विरोधी पक्षाची ताकद संपली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
मोदी सरकारवर आरोप हा एक केविलवाना प्रयत्न आहे. मोदींवर इथे आणि परदेशात आरोप करणे हे दुर्दैवी आहे. बाळासाहेबांचे स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत. म्हणून आम्ही ज्या लोकांसोबत निवडणुका लढविल्या त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. तुमच्यासारखे वेडेवाकडे केले नाही. घडाळ्याकडे बघून आम्ही काम करत नाही. मी रात्री उशिरापर्यंत काम करतो. राज्याला विकासाच्या रस्त्यावर नेण्याचे काम केल्याशिवाय राहणार नाही. आपले डबल इंजिनचे सरकार आहे. राज्याचा सर्वांगिन विकास करतेय, आसा दावा शिंदे यांनी केला.