धुळे – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. धुळ्यात जिल्हा परिषदेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाला २ जागांची गरज आहे. यातील १ जागा जिंकत भाजपानं विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. Dhule ZP Election Results 2021: BJP Chandrakant Patil daughter Dharti Deore wins
धरती देवरे या सी. आर पाटील यांच्या कन्या आहेत. त्या लामक गटातून जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत उभ्या होत्या. भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत धरती देवरे यांनी बाजी मारली आहे. मागील निवडणुकीत धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी १४ जागांपैकी २ जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परिषद १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी मतदान झाले. यातील एका गटात शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
सध्या धुळे जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाच्या हातात आहे. याठिकाणी ५६ पैकी २७ जागा भाजपाकडे आहेत तर शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस ३ तर काँग्रेसकडे ६ जागा आहेत. धरती देवरे यांच्या विजयानंतर आता भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी एका जागेची गरज आहे. महाविकास आघाडीने भाजपाला बहुमत मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. भाजपाला जागा मिळू देणार नाही असा दावाही काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी केला होता.
मागच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ३९ जागांवर विजय मिळवित भाजपने प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवित सत्ता परिवर्तन केले होते. परंतु ओबीसी आरक्षणावरून भाजपाच्या १२ सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर भाजपाचे संख्याबळ २७ इतके झाले. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ हवं. त्यामुळे भाजपाला जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी २ जागांची गरज होती. त्यातील १ जागा भाजपाच्या खात्यात जमा झाली आहे.
पक्षीय बलाबल
एकूण जागा - ५६
भाजप – ३९ – १२ = २७
काँग्रेस – ०७ – १ = ६
शिवसेना – ०४ – २ = २
राष्ट्रवादी - ०३
अपक्ष - ०३