शिरपूर : येथील तहसिल कार्यालयात पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीसाठी मतमोजणी झाल्यानंतर शिंगावे गणातील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत दामोदर पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यामुळे ते बाहेर पडताच भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकच जलोष केला. त्यानंतर विजयी उमेदवार कार्यालयाकडे येण्यासाठी कार्यकर्त्यांसह निघाले असतांना त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्यामुळे त्यांच्यात धुमश्चक्री झाली. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे गर्दी पांगविली. दरम्यान, या घटनेत शिंगावे येथील उपसरपंच चंद्रकात उर्फ भुरा लोटन पाटील रक्तबंबाळ झाल्याने त्यांच्यासह अन्य ५ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
६ रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास शिंगावे गणाचा निकाल जाहिर झाल्यामुळे भाजपचे उमेदवार चंद्रकांत दामोधर पाटील हे मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. धुळे जि़.प.चे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील व विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांना भाजपा व शिंगावे गणातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर धरत जल्लोष केला़ त्यानंतर ते करवंद नाक्याजवळील आमदार कार्यालयात आमदार काशिराम पावरा यांना भेटण्यासाठी निघाले.
विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील हे आमदार कार्यालयाकडे भाजपा कार्यकर्त्यांसह निघाले असतांना शिरपूर-शहादा मार्गावर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून शिवीगाळ केली. यावेळी भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मतमोजणी बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलिसांना कळताच त्यांनी येऊन लाठीमार सुरू केल्यामुळे गर्दी पांगविली. या घटनेत दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाले.
या घटनेत शिंगावे येथील उपसरपंच चंद्रकांत उर्फ भुरा पाटील वय ३७ हे रक्तबंबाळ झाल्यामुळे त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच दिनेश महादू पाटील, दीपक मुरलीधर पाटील, प्रेमानंद राजेंद्र पाटील, सागर नाटू पाटील, विजय अशोक पाटील हे जखमी झाले. रूग्णालयात पुन्हा दोन्ही गट येऊ शकतात म्हणून पोलिसांकडून उपजिल्हा रूग्णालयात छावणीचे स्वरूप आले. दरम्यान, शिंगावे गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़
निवडणूक निकालानंतर आमदार कार्यालयाकडे कार्यकर्त्यांसह जात असतांना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. हल्ल्यात माझ्या कार्यकर्त्यांना दुखापती झाल्या.चंद्रकांत दामोदर पाटील, विजयी उमेदवार
विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चालत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. मिरवणूकीची परवानगी नसतांना मिरवणूक काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो.- शिरीष पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिरपूर