मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. बुधवार, २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा चॅट होणार आहे. सध्या देशामध्ये असलेली अराजकसदृश परिस्थिती, हरयाणा, दादरीसारख्या असंवेदनशील घटना, केंद्र आणि राज्यातल्या सरकारने केलेला जनतेचा भ्रमनिरास, महागाई, निसर्गचक्र आणि सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेली निराशाजनक परिस्थिती, व्यक्तिस्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्यावर येत असलेली गदा आणि एकूणच सध्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर सामान्य जनतेच्या मनात असणारे प्रश्न थेट फेसबुकवर मांडता येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या परिपत्रकात सांगण्यात आले. यापूर्वीही शरद पवार यांनी फेसबुक लाइव्ह चॅट केले असून, त्या वेळी त्यांना ४ हजार ७९४ प्रश्न विचारण्यात आले होते. यातील अनेक प्रश्नांना पवार यांनी उत्तरे दिली होती. त्या लाइव्ह चॅटमध्ये एकूण २ लाख ६३ हजार ९२७ लोकांनी पेजवर आपला सहभाग नोंदविला होता.
शरद पवार साधणार फेसबुकद्वारे संवाद
By admin | Published: October 28, 2015 1:50 AM