धनंजय मुंडेंनी मंगळवारी (४ मार्च) राजीनामा दिला. पण, त्यापूर्वीच्या रात्री एक बैठक झाली. याच बैठकीत 'तुम्ही राजीनाम्याचा निर्णय न घेतल्यास, मला तुमची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल', असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना दिल्याचे म्हटले गेले. याबद्दलच देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी काय उत्तर दिले वाचा...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने करण्यात आली, याचे फोटो समोर आले. राज्याभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली, त्याचबरोबर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणीही झाली. त्याच रात्री म्हणजे ३ मार्च रोजी मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली.
या बैठकीत काय चर्चा झाली, याबद्दलचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले गेले. 'धनंजय मुंडेंनी राजीनामा न दिल्यास, याबद्दल राज्यपालांना पत्र लिहावं लागेल आणि मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल', असा इशारा फडणवीसांनी या बैठकीत दिला होता, अशी चर्चा आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कसा झाला?
एका मुलाखतीमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा योग्य वेळी झाला की, चुकीच्या वेळी झाला? या वादात मी जाणार नाही. बघा, राजकारणात तुम्ही पहिल्या दिवशी घ्या, दुसऱ्या दिवशी घ्या किंवा शेवटच्या दिवशीही घेतला, तरी लोक बोलतातच."
"आम्ही खूप स्पष्ट भूमिका आम्ही यामध्ये घेतली की, ज्या प्रकारचे फोटो समोर आले आहेत. ज्या प्रकारे ही हत्या झाली आहे आणि हत्येमध्ये ज्याला मास्टरमाईंड ठरवण्यात आले आहे, तो जर मंत्र्याच्या इतका जवळचा आहे, तर मग मंत्र्यांने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंडेंच्या निर्णयाला विलंब का झाला?
"मला वाटतं की, महायुतीचं राजकारण, कधी कधी निर्णयाला वेळही लागतो. पण, आम्ही ठामपणे भूमिका घेतली आणि त्यांनी राजीनामा दिला", अशी भूमिका फडणवीसांनी मुंडेंच्या राजीनाम्याला झालेल्या विलंबाबद्दल मांडली.
मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची धमकी दिली?
मुलाखतकाराने फडणवीसांना प्रश्न केला की, माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं नाही. मी आपल्याला विचारलं होतं की, तुम्ही धनंजय मुंडेंना धमकी दिली की, मंत्रिमंडळातून काढून टाकू आणि त्यानंतर हा निर्णय झाला?
या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "बघा, मला जे सांगायचं होतं, ते खूप स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलं आहे. त्यापुढे जाऊन काही सांगणं योग्य नाही."
त्यावर त्यांना विचारण्यात आलं की, म्हणजे तुम्ही हे नाकारत नाही आहात? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'या पुढे काही सांगणे योग्य नाहीये.'