राजकोट : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढला जाणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत. तसेच, भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आपल्या समर्थकांसह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. यावेळी, राजकोट किल्ल्यावर नारायण राणे समर्थक आणि आदित्य ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं
यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही आतमध्ये येत असताना गर्दी होती. धक्काबुक्की सुरू झाली. तरीही मी माझ्या कार्यकर्त्यांना धरून होतो. पण भाजपची बालबुद्धी बाहेर येत आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे स्वतःहून घडवून आणलंय का? भाजपमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का? ते सतत दिल्लीत जात असतात. तसेच, महाराष्ट्रात काही झालं तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भाजप चोरी करू शकतात, हे अकलनाच्या पलिकडे आहे. हे व्हायला नको होतं. जगात अनेक पुतळे आहेत, जे समुद्र किनारी आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा १३८ वर्ष जुना पुतळा आहे. तर जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र गेलं होतं. अवघ्या सहा महिन्यात पुतळा निकृष्ट असल्याचं दिसलं. आपटे नावाचा मुलगा कुठे आहे. तो फरार कसा झाला. काल एक निर्लज्ज मंत्री आला आणि म्हणाला यातून चांगलं काही तरी घडेल. महाराष्ट्रात ज्या घटना घडत आहेत. पुण्यातील घटना असेल. बदलापूरमध्ये दहा दिवसानंतर एफआयआर घेतला. महाराजांचा पुतळा पडला. भ्रष्टाचारी सरकार आहे. महाराजांनाही हे सरकार सोडत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
विषय दुसरीकडे वळवायचाय म्हणून हा राडा केला जातोय - वैभव नाईकछत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरुन नारायण राणे लक्ष विचलित करण्याचं काम करत आहेत. स्मारकाच्या कामात ज्याप्रमाणे भ्रष्टाचार झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. यावरुन विषय दुसरीकडे वळवायचाय म्हणून हा राडा केला जात आहे. १५ मिनिटात हे गेले नाहीतर आम्ही देखील घुसू आणि शिवसेनेची ताकद दाखवू, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.