Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? त्या मुद्द्यावरून अजित पवार भडकले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 04:47 PM2022-07-25T16:47:49+5:302022-07-25T16:48:46+5:30
Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबई - नाट्यमय घडामोडींनंतर राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घणाघाती टीका केली आहे. या सरकारकडे जर बहुमत आहे तर त्यांनी तातडीने मंत्रिमंडळाचा विस्तार केला पाहिजे. तसेच राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआ सरकारच्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरही अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे-फ़डणवीस सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेत का? तुमची सत्ताही कधीतरी जाणारच आहे, असा इशारा त्यांनी दिला.
शिंदे सरकारकडून मविआ सरकारच्या काळातील निर्णयांना देण्यात येत असलेल्या स्थगितीवर टीका करताना अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत काम केलंय, त्यांनीच मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावलाय. असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकारं येत असतात जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत. त्याचा विचार करायचा की नाही, असे अजित पवार म्हणाले.
२०२१ पर्यंतची कामं बंद करणं योग्य नाही. विकासाची कामं होती. महाराष्ट्रातील कामं होती, कुणाच्या घरादारातील कामं नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू य़ेथील नियोजित स्मारकाचा निधीही स्थगितीमुळे रखडलाय. राजर्षी शाहू महाजारांचा निधीही अडकलाय. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय असं खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रात झालं नव्हत. हे तातडीने थांबवा, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
यावेळी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारावरूनही अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजूनपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनाच माहिती आहे. आपणच सरकार चालवतोय हे बरं आहे, बाकीचा कुणाचा त्रास नाही, यामुळे त्यांचं चाललंय की आणखी काही कारणाने चाललंय, लोकशाहीत असं वागून चालत नाही. कारण असे प्रसंग येतात तेव्हा पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची भूमिका ठरते.