महायुतीचे उमेदवार नारायण राणे 48 हजार मतांनी निवडून आले. 10 वर्ष निष्क्रीय असलेल्या विनायक राऊत यांना बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला होता. राणे यांनी मागील 40 वर्ष केलेळ्या सेवेची पोचपावती जनतेने दिली आहे. कुडाळ मालवणच्या जनतेने 2014 चे शल्य दूर केले आहे. ही वैभव नाईक यांची हार आहे. तर दीपक केसरकर हे सामनावीर आहेत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळला असे सांगत आमदार नितेश राणे यांनी किरण सामंतांकडून दगाफटका झाला की नाही यावर भाष्य केले आहे.
केसरकर यांनी केवळ शब्दात न ठेवता कृती करून दाखवली आहे. जस काम केसरकर यांनी केले तसे काम इतर कार्यकर्त्यांनी करावे. यापुढे महायुती ताकदीने उत्तरत असेल तर महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. उबाठा हा आपला एकमेव शत्रू पक्ष आहे. जर महायुती धर्म पाळला नाही तर पुढील निवडणुका कठीण जातील. असा इशारा देत नितेश राणे यांनी उबाठाच्या अदृश्य हातांचे आभार मानले.
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राणेंना मदत केली. त्यांना उद्धव ठाकरेंची धोरणे आवडली नव्हती. विनायक राऊतांनी शिवसेना संपविण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा झाली त्यात आम्हाला शिव्या शाप दिले. लोकांनी त्याचा वचपा काढला, असे राणे म्हणाले.
उबाठावाले आणि महाविकास आघाडीवाले दिवाळी का साजरी करत आहेत? देशात महायुतीच्या जास्त जागा आहेत. मोदींचा राजीनामा मागण्या पूर्वी वरळीचा राजीनामा द्या, तुझ्या मालकाच्या मुलाच्या मतदार संघात काय झाले ते बघावे, अशी टीका राणे यांनी संजय राऊतांवर केली.
काँग्रेस नसती तर उबाठाची भावपूर्ण श्रद्धांजली झाली असती. राणे संपले असे म्हणणारे आता बिळात लपून बसले आहेत. यापुढे आमच्या मतदार संघात रोजगार देणारे प्रकल्प येणार आहेत. किरण सामंतांमुळे आम्हाला कुठलाही फटका बसला नाही. किरण सामंत यांनी आपल्या परीने चांगले काम केले. ग्रीन रिफायनरी राजापूर मध्येच उभारण्यासाठी लोकांनी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.