दादा रक्षाबंधनाला आला नाही, भाऊबीजेसाठी सुप्रिया सुळेच अजित पवारांच्या घरी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 01:22 PM2023-11-15T13:22:56+5:302023-11-15T13:23:19+5:30
काल दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार हे राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले तरी गोविंदबागेत गेले नव्हते. परंतू, रात्रीच्या सुमारास अजित पवार हे गोविंदबागेत जाऊन आले.
सार्वजनिक क्षेत्रात राजकीय वादानंतर आता पवारांच्या कुटुंबात पहिल्याच दिवाळीमध्ये एकमेकांकडे जाणे-येणे सुरु झाले आहे. अजित पवार वेगळे झाल्यानंतर पहिल्या रक्षाबंधनाला अजित दादा राखी बांधण्यासाठी सुप्रिया सुळेंकडे गेले नव्हते. यामुळे दिवाळीत तरी अजित पवार दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेला पवारांच्या घरी जाणार का असा प्रश्न पडला होता. गेल्या चार-पाच दिवसांपासूनच्या घडामोडी पाहिल्या तर अजित पवार आणि शरद पवार यांची तीनदा वेगवेगळ्या कौंटुंबिक कार्यक्रमांत भेट झाली आहे. आज भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेच अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत.
काल दिवाळी पाडव्यानिमित्त अजित पवार हे राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले तरी गोविंदबागेत गेले नव्हते. परंतू, रात्रीच्या सुमारास अजित पवार हे गोविंदबागेत जाऊन आले. पवार कुटुंबीय नाती वेगळी आणि राजकारण वेगळे असे जरी सांगत असले तरी दिवाळीतील या घडामोडींवर राजकीय फटाके फुटण्याची ही तयारी नाहीय, ना अशी चर्चा सुरु झाली आहे.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पुण्यात प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवार आणि शरद पवार व अन्य पवार कुटुंबीय एकत्र आले होते. यानंतर दोन दिवसांनी अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी हे सर्व एकत्र आले होते. यानंतर काल दिवाळी पाडव्याला अजित पवार रात्री उशिरा गोविंदबागेत गेले होते.
आताचीच घडामोड पहायची झाली तर सुप्रिया सुळे अजित पवारांचे निवासस्थान काटेवाडीत आल्या आहेत. प्रतिभा पवार या देखील गोविंदबागेतून निघाल्या आहेत. यामुळे भाऊबीजेसाठी शरद पवार अजित पवारांच्या घरी जाणार का, असा प्रश्न कार्यकरत्यांना पडला आहे. शरद पवार हे बारामती तालुक्यातील पणदरे येथे शेतकऱ्याच्या बांधावर गेले आहेत. संजय जगताप या शेतकऱ्याने एकरी 137 टन उत्पादन घेतले होते, त्या शेतकऱ्याच्या बांधावर शरद पवार गेले आहेत.