पुणे - पृथ्वीराज बाबा पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आमदारकीची उमेदवारी मागून फायदा नाही असा टोला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या विलासरावजी देशमुख थ्री-डी तारांगणाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. बागुल यांनी आपल्या मनोगतात आपण 30 वर्ष नगरसेवक म्हणून काम करत आहोत. त्यामुळे पुढच्यावेळी आमदारकीची उमेदवारी मिळावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. हाच धागा पकडत पृथ्वीराज बाबांकडे आमदारकीची मागणी काय करताय, बाबाच पुडच्यावेळेस आमदार होतील का नाही सांगता येत नाही असा टोला चव्हाणांना लगावत ते कदाचित खासदार होतील असे वक्तव्य पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. तसेच आबा बागुल यांना तुम्ही पुढील 30 वर्ष नगरसेवकच रहा.पुण्याला तुमची गरज आहे.या तारांगणामुळे पुण्याच्या अभिमानात एक भर पडली आहे.विलासराव माझे आवडते मुख्यमंत्री होते. ते सर्व जाती- धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जात असत. असेही बापट यावेळी म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहीत नाही - गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 5:04 PM