मुंबई, दि. 7 - शिष्यवृत्तीवरुन वाद झाल्यामुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची कन्या श्रुती बडोलेने राज्य सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती नाकारली आहे. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि यामुळे माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे पण मी शिकणार, अवकाश संशोधनात जाणारच असे श्रुती बडोले यांनी सांगितलं आहे.
मला यापूर्वी गुणवत्तेनुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिलीय असे श्रुती बडोले म्हणाल्या. पीएचडीसाठी शिष्यवृत्तीची विद्यपीठात सवलत नाहीय. गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आहे. मी राज्य सरकार कडे शिष्यवृत्ती साठी अर्ज केला. जगातल्या पहिल्या शंभर विद्यापीठ मध्ये प्रवेश मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला कुठलाही आर्थिक निकषांची अट नाही हा जीआर आहे.
पीएचडी इन सायन्स यासाठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्तीकरीता तीन जागा आहेत. या तीन जागांसाठी केवळ दोन अर्ज आलेत त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. या जागेसाठी अजूनही अर्ज आलेला नाही. तर मी कुणाला डावलून शिष्यवृत्ती मिळवली का? जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठात प्रवेश घेताना आर्थिक निकष लागू नाहीत हा माझ्या शिक्षणापूर्वीच नियम आहे. यात मी पात्र असेल तर यात माझा दोष आहे का? माझं या पूर्वीच शिक्षण गुणवत्तेनुसार झालं आहे. आता वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? असा सवाल श्रुती बडोलेनी विचारला आहे.
मी कर्ज काढून शिक्षण घेणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितलं. या पूर्वी भावाच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्त्ते अजूनही सुरू आहेत असे श्रुती बडोले म्हणाल्या. लोकप्रतिनिधी वा अधिकारी आहेत, म्हणून शेतकरी कर्जमाफी नाकारणा-या राज्य सरकारने, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्येला आणि त्यांच्याच विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या पुत्रास सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिल्यामुळे वाद निर्माण झाला.
मंत्री बडोले यांची कन्या श्रुती हिने ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठात अॅस्ट्रॉनॉमी व अॅस्ट्रोफिजिक्स विषयांत पीएच.डीसाठी प्रवेश घेतला आहे. तर सचिव वाघमारे यांचा पुत्र अंतरिक्ष याने अमेरिकेतील पेनेनसिल्वेनिया विद्यापीठात सायन्स इन इन्फॉर्मेशन सीस्टिम या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. या दोघांनाही सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती बहाल केली आहे.