मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रंगलेली नुरा कुस्ती अखेर संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत. फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपचा 126-162 असा फॉर्म्युला मान्य केल्याचे सुत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर शिवसेनेने नरमईची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं असताना गुरुवारी रात्री उशिरा भाजपा-शिवसेनेची मॅरेथॉन बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात ही बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा 162 जागा तर उर्वरित 126 जागा शिवसेना लढवणार असल्याचं निश्चित झालं असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना-भाजपा युतीमधील मित्रपक्षांच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातील 162 मधील जागा देणार येणार आहेत. मात्र या मित्रपक्षांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी दबाव टाकला जाणार असल्याची माहिती आहे. जागावाटपाबाबत आणि युतीची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे समजते.
तत्पूर्वी मंत्री दिवाकर रावते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टी'च्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपनेते गिरीश महाजन यांनी जागा वाटपाचा निर्णय अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच निश्चित करणार असून कोण काय म्हणतं याला महत्त्व नसल्याचे सांगत राऊत आणि खासदार यांना टोला लागवला होता. त्यामुळे युती तुटणार की, राहणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरवारी महाराष्ट्रात होते. त्यावेळी त्यांनी भाजपला स्पष्ट बहुमत देण्याची मागणी करून शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावरून शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या पुनरोच्चाराचा देखील मोदींनी समाचार घेतला होता. तसेच राममंदिराच्या मुद्दावर वायफळ बडबड करू नका अशी विनंती करत न्यायालयावर विश्वास ठेवा असंही सुनावले. मोदींच्या या इशाऱ्यानंतरच जागा वाटपावरून शिवसेनेने एक पाऊल मागे घेतले का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.