ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे सत्ताधा-यांना विचारला आहे. आरेतील जमीन बिल्डरांना विकण्याचा डाव असून निवडणुकीत दिलेल्या आर्थिक पाठबळाची परतफेड केली जात आहे असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.
सोमवारी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मेट्रो ३ च्या प्रस्तावित कारशेडच्या जागेची पाहणी केली. पाहणी दौ-यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका मांडली. आरेतील जमिनीवर निवासी व व्यावसायिक संकुल बांधण्याचा घाट घातला जात असून स्थानिंकाची मतं जाणून न घेता थेट मेट्रो प्रकल्पाच्या टेंडरप्रक्रियेला सुरुवात कशी केली जाऊ शकते असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आरेमध्ये वन्यप्राणी नसल्याचे पत्र सरकारने जपान सरकारला दिले आहे. यासंदर्भात गुढी पाडव्यानंतर चित्रफित दाखवून आरेत कोणत्या प्रकारचे वन्यप्राणी राहतात याचा खुलासा करु असे राज ठाकरेंनी जाहीर केले. राज्य सरकारने सगळंच विकायला काढलं असून हा पूर्वनियोजित भाग आहे, केकमधील कोणता वाटा कोणाला मिळणार हेदेखील ठरलंय असा टोला त्यांनी लगावला.