सुनिल प्रभूंचा व्हीप मिळाला नाही, पण जोशींचे मेल आले; शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 01:07 PM2023-12-08T13:07:21+5:302023-12-08T13:08:42+5:30
आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली.
आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु झाला आहे. ठाकरे गटाची मॅरेथॉ़न सुनावणी, उलटतपासणी झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरु झाली आहे. यामध्ये आज शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना साक्ष नोंदविण्यासाठी येण्यास २० मिनिटे उशीर झाला, यावर लांडेंनाच उशीर झाल्याने सुनावणी विलंबाने सुरु झाल्याचे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी रेकॉर्डवर ठेवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. यानंतर सुरु झालेल्या उलटतपासणीत लांडे यांनी अनेक प्रश्नांना आठवत नाही अशी उत्तरे दिली.
सुनिल प्रभू यांनी व्हीप बजावलेला परंतू तो आपल्याला मिळाला नाही असे लांडे यांनी सांगितले. परंतू दुसरीकडे कामतांनी एक ईमेल आयडी दाखविताच तो आपलाच असल्याचे कबुलही केले. हा मेल आयडी मतपेढीचा असल्याचे लांडे यांनी सांगितले. या मेल आयडीवर दोन मेल प्रभूंकडून गेल्याचे विचारताच, लांडे यांनी भावाने आपल्याला सांगितले की जोशींच्या मेलवरून मेल आला होता, अशी कबुली लांडे यांनी दिली.
य़ा मेलचा घटनाक्रम २ जुलै २०२२ चा आहे. तर ४ जुलैला भरत गोगावले यांनी जारी केलेला पक्षादेश कसा मिळाला, असे विचारले असता लांडे यांनी आपल्या हातात दिला गेला असे सांगितले. परंतू पोचपावती दिली का असे विचारले असता आठवत नसल्याचे उत्तर लांडे यांनी दिले आहे.
22 जून ते 20 जून 2022 दरम्यान महाराष्ट्राबाहेर होतात का असे विचारले असता लांडे यांनी ही माझी खाजगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याना मुलाखती दिल्या का, त्यात उद्धव ठाकरेंसोबत असून शिंदेंना पाठिंबा देत नसल्याचे तुम्ही बोललेलात का असा सवाल विचारताच लांडे यांनी आठवत नाही असे उत्तर दिले.
२१ जूनच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का? असा सवाल कामत यांनी केला असता लांडे यांनी आपल्याला व्हीप मिळाला नाही, गुलाबराव पाटील या व्यक्तीचा फोन आला होता, त्यावरून मी तिकडे गेलो होतो, असे सांगितले. तसेच तेथील अटेंडन्स शीटवर माझीच सही असल्याचे लांडे म्हणाले.
सुनावणीनंतर लांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. अपात्रतेबाबत न्यायालयामध्ये साक्ष चालू आहे. खरी माहिती न्यायालयासमोर ठेवत आहे. अनेक प्रश्न विचारले खरी माहिती द्यायची तरी काही अडचणीचे कारण नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयाने एकनाथ शिंदे यांना दिला आहे, असे लांडे म्हणाले.