मुंबई : डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक भार पडला आहे. मागील ४५ दिवसांत २७ कोटींचा अतिरिक्त भार पडला असून, वार्षिक भार हा तब्बल २१९ कोटी रुपयांचा असेल, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. या वाढीव भारामुळे एसटीवर आर्थिक संकटांचे ढग अधिकच गडद होणार आहे. एसटी महामंडळाला सध्या रोज १२ लाख लीटर डिझेल लागते. हे पाहता एकूणच डिझेलवर वर्षाला २ हजार ६00 कोटी रुपये महामंडळ खर्च करत आहे. आता मात्र, १ आॅक्टोबरपासून वाढत गेलेल्या डिझेलच्या दरांमुळे महामंडळाला वाढीव भार सहन करावा लागणार आहे. १ आॅक्टोबर रोजी राज्य सरकारकडून डिझेलवर २ रुपये व्हॅट आकारण्यात आला आणि त्याच दिवशी केंद्राकडून ४९ पैसे प्रति लीटर दर वाढविण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत ६२ पैसे प्रति लीटर वाढ करण्यात आली. या वाढीनंतर तरी एसटीला दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच १६ नोव्हेंबरपर्यंत वाढ होतच राहिली. १ नोव्हेंबरपासून ८४ पैसे प्रति लीटर वाढ केली आणि अर्धा टक्के स्वच्छता उपकरही आकारला, तर १६ नोव्हेंबरपासून ८९ पैसे डिझेल दरवाढ झाली. त्यामुळे १ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबरपर्यंत २७ कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे.
एसटीला बसणार डिझेल दरवाढीचे चटके
By admin | Published: November 30, 2015 2:45 AM