मुंबई : लॉकडाऊनमुळे एसटीचे चाक बंद आहे. परिणामी, एसटीचे प्रवासी उत्पन्न बंद झाले आहे. यात डिझेलची दरवाढ झाल्याने एसटीला आणखीन आर्थिक झळ बसताना दिसून येत आहे. १ जूनपासून डिझेलचे ६४.४८ रुपये दर झाल्याने एसटीचे चाक तोट्याच्या खड्ड्यात आणखी रुतले जाणार आहे. लॉकडाऊन काळात दरदिवशी पेट्रोल, डिझेल दरवाढ होत आहे.एसटी महामंडळाने २१ मे रोजी ५५.१८ रुपयांमध्ये डिझेल विकत घेतले होते. मात्र १ जूनपासून ६४.४८ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे १० दिवसांत एसटीला जादा ९.१३ रुपये मोजावे लागत आहेत. एसटी महामंडळाच्या नियमित सेवेसाठी दररोज १२ लाख लीटर डिझेल लागले. त्यातून महामंडळाला दैनंदिन २२ कोटींचे उत्पन्नसुद्धा मिळते.मात्र, सध्या एसटीची प्रवासी सुविधा संपूर्ण बंद आहे. फक्त मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, राज्यामध्ये आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंंगच्या नियमांचे पालन करताना २२ प्रवासी अत्यावश्यक सेवेत बसतात. मात्र, राज्यातील इतर विभागात एक फेरीत सरासरी ७ ते ८ प्रवाशांचा प्रवास होत आहे. परिणामी, एसटी महामंडळाला डिझेलच्या खर्चाचा भार सोसावा लागत आहे.एसटी खर्च कसा भागविणार विविध सवलत मूल्यांच्यÞा प्रतीपूर्तीसाठी राज्य सरकारकडे शिल्लक असलेली रक्कम एसटीला देण्यात येत होती. आता मात्र फक्त २७ कोटी रक्कम राज्य सरकारकडे शिल्लक आहे. प्रवासी उत्पन्न बंद असल्याने आता कर्मचाऱ्यांचे वेतन, इंधन खर्च आणि इतर खर्च करताना एसटीला अडचणी येणार आहेत.कोरोनाच्या काळात एसटी डबघाईला आली आहे. यात डिझेलचे दर वाढल्याने एसटीला आणखी आर्थिक फटका बसणार आहे. एसटीचा डिझेलवर एसटीला एकूण वर्षाला २ हजार ८०० कोटी रुपये खर्च येतो. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचा मूल्यवर्धितकर माफ केला पाहिजे. यामुळे एसटीची वर्षाला १ हजार २०० कोटी रुपयांची बचत होईल, अशी प्रतिक्रिया एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिली.
डिझेल दरवाढीचा एसटीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:52 AM