ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 13- टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटल्याने जालन्यात डिझेल टँकर उलटल्याची घटना घडली आहे. डिझेल टँकर विद्युत खांबाला धडकून ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रकने पेट घेतल्यामुळे चालकाचा कॅबिनमध्येच जळून मृत्यु झाला आहे.तर एक जण जखमी झाला आहे. जालना औरंगाबाद रस्त्यावरील बारवाले महाविद्यालयाजवळ सोमवारी मध्यरात्री दीडवाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मृत चालकाचं नाव रामकिसन वामन फड असून ते नांदेडमधील कंधारचे राहणारे आहेत. तसंच क्लीनर देवानंद देवराव नाईकवाडे ट्रकच्या बाहेर फेकला गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अपघातग्रस्त टँकर मनमाडहून नांदेडकड़े जात होता. जालन्यातील बारवाले महाविद्यालयाजवळील एकता हॉटेल समोर टँकरचं मागील टायर फुटलं. त्यामुळे चालक वामन फड यांचं नियंत्रण सुटून टँकर रस्त्याच्याकडेला असलेल्या उच्चदाबाच्या विद्युत खांबाला धडकला. वीजप्रवाह असलेला विद्युत खांब खाली पडल्यानं काही क्षणात टँकरने पेट घेतला. डिझेल गळतीमुळे आग भडकल्याने चालक फड यांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे त्यांचा कॅबिनमध्येत जळून मृत्यू झाला. आगीवर निंयत्रण मिळविण्यासाठी जालना औरंगाबदच्या तीन अग्निशमन बंबला दोन तास लागले. या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उप निरिक्षक सी.जे. गिरासे तपास करत आहे.