नाशिक - पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून काल पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता डिझेलच्या दरात आणखी चार रुपयांनी कपात करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.
इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करीत असून आज डिझेल 4 रुपयांनी स्वस्त करण्याबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे वार्ताहरांशी बोलताना दिली. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत कार्यक्रमानंतर ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारने कर कमी केल्याने काल पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी करण्यात आले. आज डिझेल संदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी होईल असे ते म्हणाले.
ऑइल कंपन्यांच्या दर नियंत्रणसंदर्भात केंद्र सरकार धोरण तयार करीत आहे. तरीही राज्य आणि केंद्र सरकारने आर्थिक बोजा सोसून इंधनावरील दर कमी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच इंधन दर कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय जीएसटी काँसिल ने घेणे अपेक्षित असून, जीएसटीत इंधनाचा समावेश केल्यास देशभरात एक सारखे दर होतील, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र पोलीस अकाडमीचा 115 वा दीक्षांत सोहोळा आज सकाळी अकादमीच्या मैदानावर पार पडला यावेळी 819 प्रशिक्षित पोलिस उप निरिक्षक अधिकाऱ्यांची तुकडी पोलीस दलात सामील झाली प्रशिक्षणार्थीनी शानदार संचालन केले. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृह राज्यमंत्री ग्रामीण चे दीपक केसरकर, शहरी विभागाचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.