- चेतन पाठारे सुंदर, पीळदार शरीर असण्याची भावना तरुणांसह तरुणींमध्ये रुजत आहे. मात्र प्रत्यक्षातील आव्हानांकडे युवावर्ग कानाडोळा करतो. आपली कुवत लक्षात न घेता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून कौटुंबिक वैद्यकीय स्थिती लक्षात न घेता रात्रीत शरीर कमवण्याच्या नादात थेट मृत्यूला कवटाळतो. याची प्रचिती गत आठवड्यात वसई आणि नाशिकमध्ये घडलेल्या घटनांमधून आली आहे. त्यामुळे तरुणांनी सजग राहणे गरजेचे आहे. तरुण वयात शरीर ‘पीळदार’ असावे ही भावना मुलांच्या मनात जागृत होते; तर ‘फिगर’ मेंटेन करण्याची गरज असल्याचा विचार तरुणींच्या डोक्यात येतो. त्यामुळे शोध सुरू होतो व्यायामशाळा आणि फिटनेस ट्रेनिंग सेंटर, फिटनेस अॅकॅडमी अशा गोष्टींचा.फिटनेस आणि त्याबाबतची जागरूकता गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुदृढ भविष्याच्या दृष्टीने ही बाब चांगली असेलही, मात्र शरीराची कुवत, जीवनशैली, आहार आणि कुटुंबातील अनुवांशिक वैद्यकीय आजार यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका रात्रीत शरीर कमावण्याच्या ‘मृगजळा’कडे सध्या तरुण-तरुणी ओढले जातात. व्यायामशाळा अथवा फिटनेस अॅकॅडमीमध्ये जाणे गैर नाही. मात्र तेथे गेल्यावर काही उपाययोजना करणे गरजेचेआहे. बहुतांशी युवावर्गाकडूनकुटुंबातील मेडिकल कंडिशन अर्थात कौटुंबिक वैद्यकीय स्थिती सांगितली जात नाही. परिणामी, त्याचा फटका युवावर्गाला बसतो.आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणावाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी, तणावामुळे मधुमेह, हार्ट-अॅटॅक यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हल्लीच्या युवा पिढीमध्ये तणाव घालण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो. धूम्रपान आणि मद्यपान केल्याने त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात. झोपेत असल्यानंतर शरीर रचना नव्याने उभारी घेत असते. परिणामी, धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप न घेता व्यायामामुळे शरीराची झीज होते. शरीर रचनेला उभारीसाठी पुरेसा अवधी मिळत नाही. परिणामी, रक्तदाब वाढणे, हार्ट-अॅटॅक यांसारख्या आजारांना ऐन तारुण्यातच कवटाळावे लागते. व्यसनांमुळे स्ट्रेस दूर होतो ही समजूत चुकीची आहे. ही महत्त्वाची गोष्ट युवा वर्गाने लक्षात घेणे गरजेचे आहे.अस्तित्वात असलेल्या व्यायामशाळा, फिटनेस अॅकॅडमी हे वन टाइम इन्व्हेंस्टमेंट म्हणून व्यवसाय उभे राहू लागले आहेत. या व्यायामशाळा उभारणीसाठी कोणतीही नियमावली अस्तित्वात नाही. किंबहुना त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. शरीर कमावण्यासाठी व्यायामाची गरज आहे. मात्र व्यायामासह डाएटही तितकाच महत्त्वाचा मानला गेला आहे. सध्या बहुतांशी व्यायमशाळांत आणि फिटनेस अॅकॅडमीमध्ये अनुभवी डाएटिशीअनची नेमणूक केली जात नाही. अशा वेळी संबंधित ट्रेनर अथवा संचालक अर्धवट माहिती देतो. त्यामुळे डाएटवर दुर्लक्ष करून केवळ व्यायाम करणे हे शरीरासाठी अयोग्य असते. एकंदरीत तारुण्यात पदार्पण करणाऱ्या युवावर्गाने शरीर कमावण्याच्या बाबतीत योग्य संयम राखणे गरजेचे आहे. मुळात कोणतीही गोष्ट अल्पावधीत साध्य केली जात नाही. कमी वेळात मिळालेले यशाचे भविष्य अपयशी ठरल्याची उदाहरणे इतिहासात दिसून येतात. त्यामुळे मेहनत, श्रम करण्याची शारीरिक क्षमता, योग्यडाएट, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुरेशी झोप आणि कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर योग्य व्यायाम करून सुदृढ शरीर बनवणे गरजेचे आहे. कारण वय आहे आज तरीही, मृत्यूचे भय आहे...(लेखक जागतिक बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिजीक फेडरेशनचे सहसचिव आहेत.)ही दक्षता घ्याएका रात्रीत शरीरसौष्ठवपटू होणे हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे युवा वर्गाने संयम बाळगणे, योग्य डाएट पाळून व्यायाम करणे गरजेचे आहे. इंटरनेटवरील सर्व माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे ती माहिती तपासूनच अंमलात आणावी. व्यायामशाळेतील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला मानणे गरजेचे आहे. जीवनशैलीमध्ये मानसिक त्रास कमी करण्यासाठी व्यसने टाळावीत. दुसऱ्या व्यक्तींशी स्वत:च्या शरीराची तुलना करू नये. - सचिन सोनावणे,फिटनेस तज्ज्ञ(शब्दांकन : महेश चेमटे)
व्यायाम करताना आहारही महत्त्वाचा!
By admin | Published: July 02, 2017 1:25 AM