मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वयाला सुरुंग लावण्याकरिता विधान परिषदेच्या उपसभापतिपदाचा वाद उपस्थित करण्याची रणनीती भाजपाकडून आखण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाप्रणीत सरकार सत्तेवर आले तेव्हा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद निर्माण केला गेला. उभय पक्षांनी या पदावर दावा केला होता. जोपर्यंत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर होत नाही तोपर्यंत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर न करण्याच्या तत्कालीन सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या भूमिकेमुळे वाद चिघळला. यावेळी दोन्ही काँग्रेसनी आपल्यातील समन्वय दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. त्या समन्वयात बिब्बा घालण्याचा प्रयत्न भाजपा करणार असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर हे सभापती झाल्याने उपसभापतिपद आपल्याला मिळावे, ही काँग्रेसची मागणी आहे. त्या पक्षाचे शरद रणपिसे यांचे नाव या पदाकरिता घेतले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले हेही या पदाकरिता उत्सुक आहेत. भाजपाकडून पांडुरंग फुंडकर यांचे नाव या पदाकरिता चर्चेत आहे. उपसभापतिपदावरून दोन्ही काँग्रेसला झुंजवून विधान परिषदेतील विरोधकांच्या बहुमतामुळे सत्ताधाऱ्यांच्या होणाऱ्या कोंडीवर मात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
उपसभापती पदावरून विरोधकांत फुटीची रणनीती
By admin | Published: July 14, 2015 12:10 AM