लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसमोर आता रोज नवीन आव्हाने उभी राहत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. आता विधिच्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी ४५ टक्क्यांची मर्यादा असतानाही ४९ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाइन स्वीकारले जात नाहीत. गुणांची मर्यादा वाढल्यास शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे टीवायचे निकाल लागण्याची चिन्ह नसल्याने हजारो विद्यार्थी तणावाखाली आहेत. शेकडो विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने सीईटी सेलने यावर तातडीने कार्यवाही करून सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. विधि अभ्यासक्रमांसाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया २३ जूनपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत ५ जुलैपर्यंत आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरता येणार नाहीत. एलएलबीच्या अभ्यासक्रम माहितीपुस्तिकेत ४५ टक्क्यांची मर्यादा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात अर्ज भरताना ४७ अथवा ४८ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ जूनला सुरू झाली. ४९ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत ४९.५० टक्क्यांहून कमी गुण असल्यामुळे तुमचा अर्ज स्वीकारला जात नसल्याचा मेसेज येत आहे. याबाबत युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी सीईटी सेल आयुक्त चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची गैरसोय तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.
विधि अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची वाट अवघडच
By admin | Published: June 27, 2017 2:26 AM