पुणे : अभिनय, दिग्दर्शनाचे धडे देणारी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) मुलांना सोप्या आणि रंजक भाषेत गणिताचे धडेदेखील देणार आहे. रेडिओ एफटीआयआयच्या माध्यमातून तब्बल १८० भागांची मालिका मराठी भाषेतून करण्यात येणार असून, त्यात कागद, काच, कचरा वेचणारी मुलेच मुख्य भूमिका बजावणार आहेत.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि कागद काच पत्रावेचक कष्टकरी पंचायतीच्या सामाजिक कार्यकर्त्या मैत्रेयी शंकर यांच्या हस्ते झाले.गणित विषयासंबधी प्रत्यक्ष लोकांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही गणित मालिका प्रामुख्याने तळागाळातील लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. केळेवाडी, जनता वसाहत, दांडेकर पूल या परिसरात पाहाणी करण्याचे काम शर्ली दीपक यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर ८ ते १४ मेदरम्यान कागद, काच पत्रावेचक कष्टकरी पंचायत तसेच दीपस्तंभ या संस्थांच्या मुलांना यानिमित्त प्रशिक्षण देण्याच्या कामाचीही सुरुवात होणार आहे. रोजच्या व्यवहारात आपल्याला गणिताचा कसा उपयोग होतो, हे विविध व्यवसायांमध्ये असलेल्या लोकांच्या उदाहरणाने स्पष्ट करण्यात येईल, असे प्रकल्पाचे संयोजक व रेडिओ एफटीआयआयचे संजय चांदेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवघड गणित होणार रंजक!
By admin | Published: May 02, 2017 4:14 AM