मुंबई : राज्यातील शालेय शिक्षणात सुधारणा व्हावी, दर्जा सुधारावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ८ नोव्हेंबरपासून शाळांमध्ये मूल्यमापन परीक्षा १ सुरू होणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर या महिना अखेरपर्यंत शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण करायची आहे. पण या परीक्षांसाठी अभ्यासक्रम जाहीर न केल्याने शिक्षक संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे कसे, हा प्रश्न असल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.सध्या शाळांचे दुसरे सत्र सुरू झालेले नाही. तसेच या परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर न केल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन करायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. राज्यभरातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची मूल्यमापन परीक्षा घेण्यात येते. ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान राज्यभरातील शाळांमध्ये एकाच वेळी म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे. विषयनिहाय वेळापत्रक प्राधिकरणाने जाहीर केले आहे.टीचर्स डेमोकॅ्रटिक फ्रंटतर्फे याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शाळांना दिलेल्या निर्देशनानुसार, ७ नोव्हेंबरला शाळांमध्ये विद्यार्थी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या दुसºयाच दिवशी मूल्यमापन परीक्षा सुरू होणार आहे. तसेच मुंबईतील अनेक शाळा या दोन सत्रांतभरतात. त्यामुळे एकाच वेळी या परीक्षांचे पेपर घेणेही शाळांना अवघड जाणार आहे.
मूल्यमापन परीक्षेच्या अभ्यासाबाबत संभ्रम, मार्गदर्शन करणे शिक्षकांसाठी कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:06 AM